जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये गत चार दिवसापासून भाग बदलत वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. दि १२ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून जळकोट तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. प्रचंड विजेचा कडकडाट तसेच वादळी वारे यासह पाऊस कोसळला . संध्याकाळी आठच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक होता .
जळकोट तालुक्यामध्ये सलग ४ दिवसापासून पाऊस कोसळत असल्यामुळे तालुक्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या रब्बी ज्वारीचे नुकसान होत आहे. यासोबतच सतत वारे सुटत असल्यामुळे आंब्याचेही नुकसान होत आहे. सलग चार दिवस पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. गत महिनाभरापासून प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणा-या नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. असे असले तरी या अवकाळी पावसामुळे शेतक-यांंचे नुकसान होत आहे. वादळी वा-यासह होत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागासह शहरातही
वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.