लातूर : प्रतिनिधी
उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात जावून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना रहावे लागते. अशा विद्यार्थिनींची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा गांभीर्याने व संवेदनशीलतेने विचार करून शासनाने विद्यार्थिनींना योग्य सुरक्षा पुरवावी. त्यासाठी ठोस आराखडा बनवावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी येथे केली.
शिक्षणासाठी पुण्यात राहत असलेली भाग्यश्री सूर्यकांत सुडे या लातूरच्या विद्यार्थिनीचा पुण्यात खंडणीसाठी निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी लातूर येथे काढण्यात आलेल्या न्याय मोर्चात ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज देशमुख हेही सहभागी झाले होते. यावेळी भाग्यश्री सुडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आमदार धिरज देशमुख म्हणाले, आजच्या या मोर्चात सहभागी झालेल्या जनसमुदायातील प्रत्येकाची एकच प्रमुख मागणी आहे की ‘आमच्या लेकीला न्याय हवा’. सरकारने लातूरकरांची, पालकांची ही मागणी ऐकून घेवून त्या दृष्टीने पावले टाकावीत. या प्रकरणाचा योग्य तपास करावा. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. निष्णात सरकारी वकीलाची नेमणूक करावी. सर्व आरोपींना कठोर शासन करावे. या मागण्या मान्य करून घेवून लातूरच्या लेकीला जलद न्याय मिळवून देण्यासाठी असेच ठामपणे सर्वजण उभे राहू.