मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आरोपही केले. विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले,राम मंदिर हा विषय सोपा नव्हता.
कारसेवकांची प्रेतं, घातलेल्या गोळ्या, या जखमा आहेत. कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तरी नरेंद्र मोदी असल्याने याचे निर्माण झाले आहे. नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते. या खंबीर नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा दिला असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदींना पठिंबा हे गुढीपाडवा मेळाव्यात मी सांगितले. त्याचे विश्लेषणही केले. समर्थन आणि विरोध हेसुद्धा तेव्हा स्पष्ट केले. मी भूमिका बदलली नाही तर धोरणांवर टीका केली. ३७० कलम निर्णयाचे स्वागत केले.
महायुतीच्या प्रचारात सहभागी होण्यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरेंनी सांगितले की, प्रचारात सहभागी होण्याबाबत महत्त्वाचे निर्णय बैठकीत सांगितले. महायुतीतील नेत्यांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधायचा हा निर्णय घेतला. महायुतीतील नेत्यांनी आम्हाला संपर्क केला की निर्णय होतील. प्रचारात मनसे सक्रिय सहभाग घेणार आहे.
पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, महायुतीच्या सभांबाबत अद्याप ठरलेले नाही. याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे काही नेते नाराजसुद्धा आहेत. त्याबद्दल विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, ज्यांना हे निर्णय समजत नाहीत ते त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो.