१८ व्या लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरू शकते. एका अंदाजानुसार या निवडणुकीत १ लाख कोटी रुपये खर्च होऊ शकतात. सेंट्रल फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालानुसार, २०१९ मध्ये निवडणुकीचा एकूण खर्च सुमारे ६० हजार कोटी रुपये होता आणि त्यावेळी ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरली होती.
२०२० च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेने भारताला सर्वात महागड्या निवडणुकीत मागे टाकले, कारण त्यामध्ये १४ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले होते.
निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये असताना एवढा खर्च करण्यात आला होता, ही खर्च मर्यादा २०२२ मध्ये ९५ लाख रुपये करण्यात आली असून त्यात ३५ टक्के वाढ झाली आहे.
या अर्थाने यंदा निवडणुकीतील उमेदवारांचा खर्च ३५ टक्क्यांनी वाढणार आहे, म्हणजेच उमेदवारांचा २४ हजार कोटी रुपयांचा खर्च ३२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
याशिवाय निवडणूक आयोगाचा खर्च आणि राजकीय पक्षांच्या खर्चातही वाढ होणार असल्याने या निवडणुकीतील खर्च १ लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
१९९८ मध्ये भाजपने निवडणुकीवर सुमारे २० टक्के खर्च केला होता, तर २०१९ मध्ये भाजपचा खर्च वाढून ४५ टक्के झाला. त्याचप्रमाणे २००९ मध्ये काँग्रेसने एकूण खर्चाच्या ४० टक्के खर्च केला, तर २०१९ मध्ये तो १०-१५ टक्क्यांवर आला.
गेल्या २६ वर्षात देशात सहा लोकसभा निवडणुका झाल्या आणि या दरम्यान निवडणूक खर्च ९,००० कोटींवरून ६० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. १९९८ च्या निवडणुकीत हा खर्च ९,००० कोटी रुपये होता तर २०१९ मध्ये हा खर्च ६० हजार कोटी रुपये होता.