कोझिकोडे : केरळवासीयांनी धार्मिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत सौदी अरेबियामध्ये मृत्यूदंडाची शिक्षाल झालेल्या एका व्यक्तीला मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेले ३४ कोटी रुपये अवघ्या ४० दिवसांत उभे केले. या घटनेमुळे केरळमधील सामाजिक वातावरण किती समृद्ध आहे याची झलक पाहायला मिळाली आहे.
२००६ पासून सौदी अरेबियातील तुरुंगात असलेल्या रहीमला हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतर २०१८ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मात्र, गेल्या ऑक्टोबरमध्ये सौदी अरेबियाच्या न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांना ब्लड मनी म्हणून ३४ कोटी रुपये दिल्यास रहीमची सुटका करण्याचे आदेश दिले होते. ब्लड मनी भरण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल होती. मुदत संपायच्या ३ दिवस आधी ही रक्कम भरण्यात आली.
सौदी अरेबियाला जाण्यापूर्वी रहीम कोझिकोड येथे ऑटो चालक म्हणून काम करायचा. रहीमला त्याच्या प्रायोजकाच्या १५ वर्षांच्या पॅराप्लेजिक मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते.
मुलाची काळजी घेणे आणि त्याचा चालक म्हणून काम करणे, अशी रहीमची जबाबदारी होती. पण एकदा रहीमकडून चुकून त्या मुलाच्या गळ्यात जोडलेले वैद्यकीय यंत्र खाली पडले. यामुळे मुलगा बेशुद्ध पडला आणि मरण पावला.
रहीमने यापूर्वी सुटकेसाठी अनेक वेळा अपील केले होते. २०११, २०१७ आणि २०२२ मध्ये प्रत्येक वेळी त्याचे अपील फेटाळण्यात आले. मात्र, यावेळी न्यायालयाने त्याचे आपील स्वीकारल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.