मोहोळ : मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी- सुविधांचा अभाव असून, तब्बल १२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विविध शस्त्रक्रियांसाठी पाणीही उपलब्ध होत नाही. केवळ २०० लिटर पाणी विकत घेऊन ते राखीव ठेवावे लागते. या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे; मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. हे ग्रामीण रुग्णालयच सध्या सलाईनवर आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मोहोळ परिसर हा अपघाती परिसर म्हणूनही ओळखला जातो. येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे अपघातातील जखमीला तातडीन पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवावे लागते. सोलापूरला उपचारासाठी जाईपर्यंत अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती आहे.
या रुग्णालयाप्त एकूण २८ पदे आहेत, त्यापैकी तब्बल १२ पदे रिक्त आहेत. केवळ १६ कर्मचाऱ्यांवर सध्या काम सुरू आहे. रिक्त जागांसंदर्भात वेळोवेळी वरिष्ठांना कळविल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या व अन्य अडचणींमुळे मोहोळचा पदभार घेण्यास कोणी धजावत नाही.
दररोज या रुग्णालयात ३०० ते ४०० विविध रुग्ण तपासले जातात. सध्या मोहोळ शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा फटका रुग्णालयालाही बसला आहे. अपघाती परिसर असल्याने अपघातात मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे.
शवविच्छेदन व इतर शस्त्रक्रियांसाठी एकावेळी किमान ५०० ते ७०० लिटर पाणी लागते. त्यामुळे टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने लसीकरण, आरोग्य तपासणी, गर्भवती माता तपासणी, सिझेरियन, नसबंदी या रुग्णसेवा देण्यात विलंब होतो आहे.मेडिकल ऑफिसर : २, मेडिकल सुपरिंटेंडेंट: १, परिचारिका : ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १, क्ष-किरण तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहायक : १. ज्युनिअर क्लर्क : १, औषध निर्माता: १, दंतचिकित्सक : १. यातील दोघेजण प्रतिनियुक्तीवर सोलापूर येथील रुग्णालयात आहेत.अशा जागा रिक्त आहेत.कर्मचारी संख्या अपुरी असल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो. रिक्त जागाबाबत पत्रव्यवहार केला आहे. दररोजची ३०० ते ४०० ओपीडी आहे. त्यासाठी रिक्त जागा भरणे गरजेचे आहे: नेणेकरून रुग्णांना वेळेत रुग्णसेवा मिळेल.असे मोहोळ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले.