अकलूज-
विचारपूर्वक आणि संयमाने आम्ही पावले उचलत आहोत. आम्हाला माहिती आहे की आमच्यावर प्रेम करणा-या जनतेला आमची भूमिका ऐकण्याची घाई झाली आहे. १४ तारखेला जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. आता नेट प्रॅक्टिस संपली असून १४ तारखेपासून ख-या अर्थाने बॅटिंग करणार असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले. विरोधकांकडे खूप आमदार असतील पण मते देणारी जनताच आमच्या बाजूला असल्यामुळे आम्ही निश्चिंत असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले.
माढा मतदारसंघात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अनेकांची नावे रोज चर्चेत येत होती. पवारांच्या पक्षाने दोन उमेदवारयाद्या प्रसिध्द केल्या पण त्यात धैर्यशील मोहिते पाटलांचे नाव येत नव्हते. त्यामुळे माढा मतदारसंघात संभ्रम वाढला होता. मोहिते-पाटील यांना पवार उमेदवारी देणार का?, धैर्यशील मोहिते-पाटील अपक्ष उभारणार? की भाजप त्यांची समजूत काढणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते. अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाजपमधील पदांचा राजीनामा दिला आणि आपण शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्ष प्रवेश करण्यापूर्वीच व अधिकृतरीत्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हे चिन्ह मतदारसंघाच्या घराघरांत पोहोचवले आहे. येत्या १४ एप्रिल रोजी पक्षप्रवेशानंतर आणि १६ रोजी फॉर्म भरल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी मोहिते-पाटलांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याने भाजपसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे. माढ्याच्या मैदानात आता ख-या अर्थाने चुरशीचा सामना पाहावयास मिळेल. पवार यांनी टाकलेल्या या डावावर भाजप या मतदारसंघात कशी पावले उचलते यावर बरेच काही अवलंबून आहे.
मोहिते-पाटील भाजपच्या विरोधात जाणार नाहीत. भाजप त्यांची समजूत काढेल या सर्व शक्यतांना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पदांच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासमोर यामुळे आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. धैर्यशील यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतल्यापासून शिवरत्न बंगला गावोगावच्या कार्यकर्त्यांनी भरून गेला आहे. कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे ‘शिवरत्न’वर दाखल होऊ लागले आहेत. या सर्व धामधुमीत भाजपचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे मात्र अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. १६ एप्रिल रोजी अर्ज भरण्यासाठी शरद पवारांसह अनेक मोठे नेते सोलापूरला हजेरी लावणार आहेत. अर्ज भरल्यानंतर अकलूज येथे कार्यकर्ता मेळावा होण्याची शक्यता आहे. यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह सोलापूर व माढा मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.