कोलकाता : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर तपास यंत्रणेने त्यांना कोलकाता कोर्टात हजर केले आणि तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर बंगळुरूला आणले दोन्ही आरोपींना १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.
दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात येणार असून लवकरच आरोपींना स्फोटाच्या ठिकाणी नेऊन घटनास्थळाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. याशिवाय, आरोपींना बंगळुरू आणि चेन्नईमध्ये मुक्काम केलेल्या ठिकाणीही नेण्यात येणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एनआयए आणि कर्नाटकपोलिसांचे आभार मानले आहेत. बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपी ताहा आणि शाजिब २८ मार्चपर्यंत कोलकात्यात होते. या कालावधीत ते कोलकातामधील ४ हॉटेल्समध्ये थांबले होते. आरोपींनी १३ मार्च रोजी लेनिन सारणी येथील पॅराडाईज हॉटेलमध्ये चेक इन केले होते आणि १४ मार्च रोजी चेक आउट केले होते.
यापूर्वी आरोपींनी १२ मार्च रोजी चेक इन केले आणि १३ मार्च रोजी येथून चेक आउट केले. यानंतर ते पॅराडाइज इनमध्ये गेले. त्यानंतर नंतर दहशतवादी २१ आणि २२ मार्चपर्यंत प्रत्येकी एक दिवस इक्बालपूर आणि खिदीरपूर येथे राहिले आणि शेवटी दोन्ही आरोपी २५ ते २८ मार्चपर्यंत खिदीरपूर-इकबालपूर येथील दुस-या हॉटेलमध्ये राहिले. बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने दोन आरोपींना अटक केल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मी एनआयए आणि कर्नाटक पोलिसांचे आभार मानतो. त्यांनी आरोपींना कोलकाता येथून अटक केली असून आता त्यांना बेंगळुरूला आणण्यात आले आहे. तपास पूर्ण होऊ द्या. त्यानंतर सर्व काही लोकांसमोर येईल.
एनआयएने दिलेली माहिती अशी, आरोपी अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब यांना कोलकात्यापासून सुमारे १९० किमी अंतरावर असलेल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा या समुद्रकिनारी असलेल्या पर्यटन शहराच्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. ताहा या स्फोटाची योजना आखण्यात आणि अंमलात आणण्यामागचा मास्टरमाईंड होता आणि शाजिबने कॅफेमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस पेरले होते.