17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीरासपच्या बालेकिल्ल्यात कोण ठरणार बाहुबली?

रासपच्या बालेकिल्ल्यात कोण ठरणार बाहुबली?

गंगाखेड : गंगाखेड विधानसभेत आजपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ रासपकडे आला आणि या पक्षाचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा पराभव करत विजय देखील मिळवला. त्यामुळे सद्यस्थितीत आ. गुट्टे यांचा हा मतदारसंघ रासपचा बालेकिल्ला ठरला आहे.

दुसरीकडे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजय जाधव यांना या मतदारसंघातून २८ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर पुलाखालून पाणी गेले असून राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खा. संजय जाधव हे ‘मशाल’ तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे रासपच्या या बालेकिल्ल्यात यावेळी कोण बाहुबली ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ठिकाणचा इतिहास पाहता लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना येथील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून दिल्याचा इतिहास आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता या ठिकाणी शिवसेनेचे खा. संजय जाधव यांना १ लाख १३ हजार २०५ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ८४ हजार ७३० मते मिळाली होती. या निवडणुकीत या ठिकाणच्या मतदारांनी खा. जाधव यांना २८ हजार ४७५ एवढे मताधिक्य मिळवून दिले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे त्यावेळचे उमेदवार आलगीर यांनी लक्षवेधी ३२ हजार ८०६ मते मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सध्या राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली असून या निवडणुकीत मतदारांना माहीत असलेली धनुष्यबाण, कमळ, घड्याळ, पंजा ही चिन्हे परभणी लोकसभा मतदारसंघात दिसणार नाहीत. नवीन राजकीय समीकरणाने महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय जाधव हे ‘मशाल’ तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत रासपचे उमेदवार आ. डॉ. गुट्टे या ठिकाणी निवडून आल्यापासून या मतदारसंघात रासपचा बोलबाला दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला कौल देतात की महायुतीच्या बाजूने देतात हे मात्र ४ जूनला लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR