पुणे : पवारांना मतदान करण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार या दोन गोष्टी असतात, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर महायुतीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याच प्रश्नावर प्रतिक्रिया घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि शरद पवार यांच्या सून सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच या वेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे. यामध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी पवार घराण्यातच लढत दिसून येत आहे. पवार विरुद्ध पवार या लढाईत पवार या आडनावाच्या व्यक्तीलाच निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले होते.
तर त्याला शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. एक घरातील पवार आणि बाहेरून आलेले पवार, या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र, शरद पवार यांनी सून सुनेत्रा पवार यांना बाहेरून आलेल्या व्यक्ती म्हटल्यामुळे त्यांच्यावर आता राज्यभरातून टीका होत आहे.