लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज दि. १४ एप्रिल रोजी १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने दि. १३ एप्रिल रोजी सकाळी शहरातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती. या रॅलीने सर्वांचे लक्षवेधले.
संविधान सन्मान रॅलीचा शुभारंभ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून झाला. मेन रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पीव्हीआर चौक परत छत्रपती शिवाजी महराज चौक ते राजीव गांधी चौक मार्गे बाभळगाव नाका ते विवेकानंद चौक, तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते गंजगोलाई मार्गे महात्मा गांधी चौकातून रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहोचल्यानंतर तेथे रॅलीचा समारोप झाला. या संविधान सन्मान रॅलीत युवकांचा सर्वाधिक सहभाग होता. निळे झेंडे, निळ्या टोप्या, निळे फेटे, स्कार्प परिधान केलेले युवक दुचाकीवरुन रॅलीत सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करीत निघालेली ही रॅली लक्षवेधी ठरली.