24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरउत्तमराव जानकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

उत्तमराव जानकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

रणजित जोशी
सोलापूर : भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी माळशिरसमधील अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांना घेऊन विमानाने नागपूर गाठले. तिथे भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून दिली. या भेटीनंतर जानकर यांनी वेळापूर गाठले. आपल्या समर्थकांशी संवाद साधला. भाजपसोबत जायचे की नाही याबद्दल निरोप १९ एप्रिलनंतर देऊ, असे जाहीर केले.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश केला. यानंतर भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे उत्तम जानकर यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. उत्तम जानकर यांच्यासाठी बारामतीहून विशेष विमान करण्यात आले होते. या भेटीनंतर जानकर यांनी नागपूरमध्येच संवाद साधला. फडणवीसांसोबत सुमारे एक तासभर चर्चा झाली.

जानकरांनी वेळापूरमध्ये मोजक्या पदाधिका-यांशी संवाद साधला. आपण राष्ट्रवादीसोबत जायचे की भाजपसोबत, असा जाहीर प्रश्न विचारला. अनेकांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याचे दिसून आले. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय १९ एप्रिलनंतर घेऊ, असे जानकर म्हणाले, रणजितसिंह निंबाळकर मंगळवारी सोलापुरात अर्ज दाखल करणार आहेत. आपण जायचे का, असा सवालही समर्थकांना विचारला. अनेकांनी नकार दिल्याचे दिसून आले. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणा-या धैर्यशील मोहिते-पाटील यांना डावलून भारतीय जनता पार्टीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज मोहिते-पाटलांनी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेला हा डॅमेज कंट्रोल दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करत मोहिते-पाटील यांच्या गळाला लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सुरू केला.

नाराज उत्तमराव जानकर यांना आपल्याकडे वळवण्यासाठी बारामतीतून खास विमानाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे बोलावून घेतले. या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. शहाजी पाटील, आ. जयकुमार गोरे, पांडुरंग वाघमोडे यांची उपस्थिती होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लावण्यासाठी उत्तमराव जानकर हे इच्छुक होते. मात्र भारतीय जनता पार्टीकडून आ. राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर उत्तमराव जानकर यांच्यापुढे माळशिरसची राखीव आमदारकी, त्याबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत ६०-४० चा फॉर्म्युला ठेवल्याची चर्चा होती. मात्र कोणताही राजकीय निर्णय अद्यापपर्यंत उत्तमराव जानकर यांनी जाहीर केला नव्हता. मोहिते-पाटील यांनी शरदचंद्र पवरांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर खास विमानाने नागपूर येथे बोलावून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, याबाबत जानकर हे कोणता राजकीय निर्णय घेतात, हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.

मी कार्यकर्त्यांचा मालक नाही, कार्यकर्ते माझे मालक आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, ही माझी जबाबदारी आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या साधक-बाधक चर्चेचा वृत्तांत बैठक घेऊन कार्यकर्त्यांपुढे मांडणार आहे. कार्यकर्ते जे सांगतील तो निर्णय येत्या दोन ते चार दिवसांत जाहीर करू, असे स्पष्टीकरण उत्तमराव जानकर यांनी दिले. भारतीय जनता पार्टीकडून दिलेला शब्द पाळला जात नाही. लोकसभा निवडणुकीत सोलापूरची उमेदवारी देण्याचा शब्द पाळला गेला नाही. माझ्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी आहे. तुमच्या सोबत राहण्याची व तुमचा प्रचार करण्याची माझी किंचितही मानसिकता राहिली नाही, अशी स्पष्ट नाराजी जानकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR