सुधीर बोर्डे
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांसाठी जनहिताची कामे केली आहेत. शेतक-यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना तर महिलांसाठी उज्वला गॅस योजना राबवली आहे. यासर्व विकास कामांचा लाभ परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मिळणार असल्याचे मत केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे.
महायुतीचे उमेदवार जानकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री कराड हे गेल्या चार दिवसांपासून परभणीत तळ ठोकून आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता कराड म्हणाले की, महायुतीचे उमेदवार जानकर ब्रह्मचारी असून देशसेवेला त्यांनी आयुष्यात प्राधान्य दिले आहे. परभणीत आता त्यांनी स्वत:चे घर घेतले असून ते परभणीकरांची सेवा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार निमित्ताने एकमेकांवर टीका होत असते. त्यामुळे जानकर यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टिकेला काहीही अर्थ नाही असे कराड यांनी सांगितले.
गेल्या १० वर्षापासून परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शहरातकिंवा जिल्ह्यात कोणते प्रोजेक्ट आणले आहेत हे सांगावे. तसेच परभणीकरांच्या विकासासाठी त्यांनी कोणती कामे केली असा सवाल करीत परभणीकरांना केंद्रात सरकार मधला खासदार निवडून देणे आवडणार आहे असे सांगितले. २० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी शहरात सभा आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने लोक जमणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे महायुतीचे महादेव जानकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवण्यासाठी मदत होणार असल्याचे मत केंद्रीय राज्य मंत्री कराड यांनी सांगितले.