मुंबई : प्रतिनिधी
यावर्षीच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराचे मानकरी महानायक अमिताभ बच्चन ठरले आहेत. गेल्यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. दरम्यान दिग्गज संगीतकार-गायक ए. आर. रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मंगेशकर कुटुंब गेल्या ३४ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. याअंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२४ हे या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता तर दुस-या वर्षी हा मान आशा भोसले यांना मिळाला होता. आता बिग बी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २०२३ रोजी पार पडणार आहे. २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले याठिकाणी होणार आहे.