मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगावमधील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून धमकीचे फोन आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
जीवे मारण्याची धमकी देणारे फोन चार ते पाचवेळा आले असून या फोनपैकी एक फोन अमेरिकेमधून आल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. यानंतर एकनाथ खडसे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.
छोटा शकीलचे नाव सांगत आम्ही तुम्हाला मारू, अशी धमकी फोनवरून देण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच फोन आल्याचे क्रमांक ट्रेस केले असता त्यातील एक फोन अमेरिकेवरून आल्याचे दिसते असे सांगत या धमकीमागे राजकीय संबंध नसल्याचे आपल्याला वाटते. तसेच पोलिस तपासातून यातील तथ्य बाहेर येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, असेही खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे स्वगृही परतणार
एकनाथ खडसे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया देत आपण लवकरच पुन्हा भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीदेखील घेतल्या होत्या.