सातारा : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साता-याची जागा महायुतीत भाजपाने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपाने साता-यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सध्या साता-याच्या उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
परंतु, या जागेवरून आता ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकलेही उतरणार आहेत. १९ एप्रिल रोजी ते उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
अभिजित बिचुकले म्हणाले, मी एकच गोष्ट सांगतो की मी १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकिट मिळावे अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केले पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. शक्तिप्रदर्शन काय असते? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही.