38.9 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर या जागांवरील तिढा अद्यापही कायम

महायुतीत ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर या जागांवरील तिढा अद्यापही कायम

मुंबई : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साता-याची जागा महायुतीत भाजपने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपने साता-यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. साता-याचा प्रश्न सुटला असला तरी महायुतीत ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर या जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे.

सातारा मतदारसंघात १९९९ पासून एकत्रित राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. यामुळेच महायुतीतील जागावाटपात ही जागा मिळावी, अशी अजित पवार यांची मागणी होती. साता-याच्या जागेवर आमचाच दावा असल्याचे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे सतत सांगत होते.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही पक्षाच्या वतीने देण्यात आला होता. भाजपने साता-याची जागा राष्ट्रवादीकडून अक्षरक्ष: बळकावली आहे. भाजप उमेदवारांच्या १२व्या यादीत साता-यातून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीने दावा करूनही भाजपने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. २५ वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ही जागा भाजपने स्वत:कडे घेतली आहे. अजित पवार यांना भाजपची दादागिरी निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही. महायुतीत गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी लढवेल, असे अजित पवार यांनी मागे जाहीर केले होते. पण चारपैकी एक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यातून निसटली आहे.

चार मतदारसंघांत अद्याप वाद
सातारा मतदारसंघ भाजपने स्वत:साठी घेतला. ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर या मतदारसंघांचा तिढा सुटू शकलेला नाही. ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला असला तरी मुख्यमंत्री शिंदे ठाणे सोडण्यास तयार नाहीत. नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच आहे. नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी उद्योगमंत्री उदय सामंत हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पालघरच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. सोलापूर आणि माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोलापुरात अर्ज दाखल केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR