मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा ला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दणका दिला आहे. राज कुंद्रा याची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.
ईडीने कुंद्राच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यात शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याचाही समावेश आहे. तसेच पुण्यात असलेला निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्सदेखील ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत राज कुंद्रावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज कुंद्रावर बिटकॉईन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणात २०२१ साली राज कुंद्राला अटक केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती. याप्रकरणी तो २ महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली. तेव्हापासून राज मास्क घालून फिरत होता. त्याला मास्क मॅन असे नावही पडले होते.