भोपाळ : लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आटोपून आता १९ एप्रिल रोजी होणा-या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांमध्ये पोहोचून उद्या होणा-या मतदानासाठीची व्यवस्था करत आहेत. याचदरम्यान, एका ग्लॅमरस पोलिस ऑफिसरचा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा फोटो मध्य प्रदेशमधील महिला पोलिंग ऑफिसरचा असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात सीधी, शहडोल, मंडला, जबलपूर, बालाघाट आणि छिंदवाडा या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. येथल मतदानासाठी निवडणुकीचे साहित्य घेऊन मतदान अधिकारी दाखल होत आहेत. त्याचदरम्यान मध्य प्रदेशचा जनसंपर्क विभाग आणि मुख्य निवडणूक पदाधिका-यांनी निवडणूक साहित्य घेऊन जात असलेल्या एका महिला अधिका-याचा फोटो शेअर केला आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ क्र. १६ येथे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी निघालेल्या निवडणूक अधिकारी असे या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
हा फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर या ग्लॅमरस निवडणूक अधिकारी कोण, असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जाऊ लागला. दरम्यान, या महिला निवडणूक अधिका-याचे नाव सुशिला कनेश असल्याचे समोर आले आहे. तसेच राज्य सरकारच्या सहाय्यक ग्रेड-३ अधिकारी आहेत. तसेच त्या छिंदवादा जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागात कार्यरत आहेत.
दरम्यान, याआधी २०१९ मध्येही अशाच एका महिला निवडणूक अधिका-याचा फोटो व्हायरल झाला होता. रीना द्विवेदी असे त्यांचे नाव होते. त्या उत्तर प्रदेशमधील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये क्लार्क असलेल्या रीना द्विवेदी ह्या इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढच्या निवडणुकांमध्ये त्या अनेकदा पाश्चात्य कपड्यांमध्ये दिसल्या होत्या.