बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या या विधानाचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका’, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले. बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजालाही नाही. मी तुमच्या वाटेला गेलो नाही. पण मराठा समाज आणि आमच्या उपोषणाविषयी त्यांना हिणवून जर बोलायचे असेल तर त्यांनी त्यांचा चष्मा काढून एकदा डोळसपणे पाहावे. माझ्या उपोषणामुळेच समाजाला अर्धे आरक्षण मिळाले आहे आणि यापुढेही उपोषण आणि सभांमुळेच राहिलेलं आरक्षणही मिळेल. पण आम्हाला टक्कर देण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या वाटेला गेलेलो नाही, तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका, असा स्पष्ट इशाराच मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. ‘विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिला. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही. मंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा शब्द दिलाय. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने, विधानसभेच्या सदस्याने ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा, कॅबिनेटमध्ये तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचे कर्तव्य आहे., असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले होते.