नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी आरोप केला की, पंतप्रधान देशात भ्रष्टाचाराची शाळा चालवत असून, त्यामध्ये ते स्वत: भ्रष्टाचाराचे विज्ञान या विषयासोबत देणगीचा व्यवसाय कसा करायचा या प्रकरणाचा धडा तपशीलवार शिकवत आहेत यासोबतच केंद्रीय यंत्रणांच्या छाप्यांमधून भाजपसाठी देणगी कशी गोळा करता येईल याचे मार्गदर्शनही करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधींनी लिहिले की, भ्रष्टाचा-यांचा अड्डा बनलेल्या भाजपने आपल्या नेत्यांसाठी एक क्रॅश कोर्स अनिवार्य केला आहे, ज्यामध्ये छापे टाकून देणगी कशी गोळा करायची? डोनेशन घेऊन ठेके कसे वाटायचे? भ्रष्ट लोकांना शुध्द करणारी वॉशिंग मशिन कशी चालवायची?
तपास यंत्रणांना वसुली एजंट बनवून जामीन आणि तुरुंगाचा खेळ कसा खेळायचा? याचे प्रक्षिशण दिले जाते. भाजपच्या या भ्रष्टाचाराच्या क्रॅश कोर्सची किंमत देश चुकवत असून, देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास भ्रष्टाचाराच्या या शाळेला कायमचे टाळे ठोकून हा अभ्यासक्रम कायमचा बंद केला जाईल, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. सत्ताधारी मोदी सरकारने देशातील तपास यंत्रणेचा गैरवापर करून भाजपने आपले बस्तान कसे बसवले आहे आणि विरोधकांची मुस्कटदाबी कशी केली आहे याची माहितीच राहुल गांधींनी आपल्या पोस्टमधून दिली आहे.
राहुल गांधी शनिवारी बिहार दौ-यावर असून भागलपूरमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. या रॅलीत राहुल गांधींसोबतच महाआघाडीचे इतर नेतेही सहभागी होणार आहेत. यामध्ये आरजेडीचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी हे देखील उपस्थित राहणार आहेत.