28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीपरभणीकर जनताच माझी माय-बाप : महादेव जानकर

परभणीकर जनताच माझी माय-बाप : महादेव जानकर

सुधीर गो. बोर्डे
परभणी : परभणी जिल्ह्यातील जमीन अतिशय सुपिक असताना या ठिकाणी आजपर्यंत शेतीशी निगडित कोणतेही व्यवसाय स्थापन करण्यात आले नाहीत. माझ्याकडे विकासाचे व्हिजन असून जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्कसह शेतीशी निगडित व्यवसाय निर्माण करून या ठिकाणच्या नागरिकांच्या हाताला काम देईन.

परभणी जिल्ह्याचा विकास करीत असताना त्यात कुठेही टक्केवारी खाणार नाही, असा उपरोधिक टोला कुणाचेही नाव घेता महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी विरोधकांना लगावला. तसेच मला घर नाही, दार नाही, कुणीही नाही. परभणीकर जनताच माझी माय-बाप आहे, अशी भावनिक सादही महायुतीचे जानकर यांनी परभणीच्या सभेत बोलताना घातली.

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा परभणी शहरात शनिवार, दि. २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजयराव बनसोडे, मंत्री अतुल काळे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आ. विक्रम काळे, आ. मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ. मोहन फड, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, भाजपा विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. हरिभाऊ लहाने, संजय केनेकर आदींची उपस्थिती होती.
या सभेत पुढे बोलताना महायुतीचे उमेदवार जानकर म्हणाले की, मी उपरा आहे अशी टीका विरोधक माझ्यावर करीत आहेत. परंतु माझ्यावर टीका करणारे देखील परजिल्ह्यातून आले आहेत. जिल्हा विकासापासून कोसो मैल दूर आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला दिल्लीत पाठवा. पंतप्रधान मोदी यांना विनंती करून परभणीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणेन. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक वांडी-तांड्यावर फिरत आहे. ज्या ठिकाणी रात्र झाली त्याच ठिकाणी मुक्काम करून दुस-या दिवशी तेथूनच पुढचा प्रवास करीत आहे. मला प्रत्येक गावात जनतेचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत असून या प्रेमाची परतफेड दिल्लीत गेल्यावर करणार असल्याचे आश्वासन महायुतीचे महादेव जानकर यांनी दिले.

पुढे बोलताना जानकर म्हणाले की, परभणी शहरात कृषि विद्यापीठाची हजारो एकर जमीन आहे. ही जमीन सिंचनाखाली आणली तर मोठ्या प्रमाणात बियाणे निर्माण करून ते शेतक-यांना पुरवू शकतो. जिल्ह्यातील हजारो युवक हाताला काम नाही म्हणून मोठ्या शहरांत गेले आहेत. त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती करून शहरात इंडस्ट्रीयल हब निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. मी परभणीत घर घेणार असून परभणीचा रहिवासी होणार आहे. गांधीनगर, वाराणसी या शहरांप्रमाणे परभणी शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावा, असे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR