नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. गेल्यावेळी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर मतदान झाले होते. त्यासाठी ६९.५८ टक्के मतदान झाले होते. यावेळी १०२ जागांवर मतदान झाले. मात्र, मतदान घटून ६० टक्क्यांवर आले आहे.
दरम्यान, वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन(ईनपीओ) या राज्यातील सात आदिवासी संघटनांच्या शिखर संस्थेने अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांतील मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळाला. सहा जिल्ह्यांतील ७३८ मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी तैनात करण्यात आले होते. तेथे नंतरही मतदान झाले नाही.
आदिवासींनी प्रथमच केले मतदान
पोर्ट ब्लेअर : अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहातील ‘शोम्पेन’ आदिवासीनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. ही आदिवासी जमाति विशेष संरक्षित जमांितच्या प्रवर्गात येतो. त्यातील ७ जणांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी वनविभागाच्या निवासी क्षेत्रात स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यांना यापूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत माहिती देण्यात आली होती. या जमातिच्या केवळ २२९ नागरिकांची नोंद आहे. त्यापैकी ९८ जण मतदार आहेत.
ईव्हीएमसह एसयूव्ही पाण्यात बुडाली
– उत्तर लखमीपूर : मतदान झाल्यानंतर ईव्हीएम नेणारी एक एसयुव्ही नदीत बुडाली. ही गाडी एका बोटीतून पैलतीरी नेण्यात येत होती. मात्र, पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे बोट उलटली.
– वाहनचालक आणि निवडणूक अधिकारी वेळीच वाहनातून बाहेर पडल्यामुळे बचावले.
– अमरपूर भागात हे पथक बिघडलेले ईव्हीएम बदलण्यासाठी जात होते.
– आरोग्य, पाणी, शिक्षणासाठी ‘मूक’ गावाचे मतदान
– देशातील ‘मूक’ गाव म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मीरमधील ढडकही या गावाने चांगल्या आरोग्य सुविधा, पाणी, रस्ते आणि शिक्षणासाठी मतदान केले.
– त्याचवेळी गावक-यांनी या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढच्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे.
– गावातील सुमारे ९० टक्के कुटुंबातील लोक मूकबधीर आहेत. उधमपूर मतदारसंघात येणा-या ढडकहीत ३५ टक्के लोकसंख्या मतदार आहे.