मुंबई (प्रतिनिधी) : समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा दिला. पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न करीत होतो; पण त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशी नाराजी व्यक्त करतानाच पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले; परंतु रईस शेख अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे.
समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभेचे आमदार रईस शेख यांनी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे. राजीनाम्याचे कारण देताना शेख म्हणाले, समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्या संदर्भातील मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडत आहे मात्र त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मी उपस्थित केलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी यांच्याकडे दिला आहे. मला आशा आहे की, राज्यातील पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचा उचित निर्णय घेतील, असे रईस शेख यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली असून पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर केल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही समर्थकांकडून देण्यात आला आहे.