22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यआता ६५ वर्षावरील व्यक्तीनांही आरोग्य विमा काढता येणार

आता ६५ वर्षावरील व्यक्तीनांही आरोग्य विमा काढता येणार

नवी दिल्ली : विमा नियामक (भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) ने आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणा-या व्यक्तींसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा काढून टाकली आहे. बाजाराचा विस्तार आणि आरोग्य सेवा खर्चापासून पुरेशा संरक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयआरडीएआयने हे केले आहे.

आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याची कमाल वयोमर्यादा काढून टाकण्यामागील आयआरडीएआयचे उद्दिष्ट हे अधिक समावेशक आणि सुलभ आरोग्य सेवा परिसंस्थेला प्रोत्साहन देणे आहे. यामुळे वैद्यकीय खर्चापासून संरक्षण मिळणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार फक्त ६५ वर्षे वयापर्यंत व्यक्तींना नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्याची परवानगी होती. परंतु नवीनतम दुरुस्तीसह कोणत्याही वयोगटातील कोणीही नवीन विमा पॉलिसी घेण्यास पात्र आहे. हा नियम १ एप्रिल २०२४ पासून आरोग्य विमा पॉलिसीसाठी लागू करण्यात आला आहे. म्हणजेच आता कोणत्याही वयाची व्यक्ती नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते. विमा कंपन्यांनी त्यांच्याकडे सर्व वयोगटातील लोकांसाठी आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध असल्याची खात्री करावी. तसेच कंपन्यांनी जेष्ठ नागरीकांच्या गरजांनुसार पॉलिसी आणावी. त्यांचे क्लेम आणि तक्रारी सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे निर्देश आयआरडीएआयने दिले आहे.

कॅन्सर, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स यांसारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी जारी करण्यास नकार देण्यास विमा कंपन्यांना मनाई आहे. अधिसूचनेनुसार, विमाधारकांना पॉलिसी धारकांच्या सोयीसाठी हप्त्यांमध्ये प्रीमियम भरण्याची सुविधा देण्याची परवानगी आहे.

आयुष उपचार कव्हरेजवर कोणतीही मर्यादा नाही
आयुष उपचार कव्हरेजवर कोणतीही मर्यादा नाही. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांसारख्या प्रणालीच्या अंतर्गत उपचारांना कोणत्याही मर्यादेशिवाय विमा रकमेचे कव्हरेज मिळेल. त्यात असेही म्हटले आहे की लाभ-आधारित विमा असलेले पॉलिसीधारक विविध विमा कंपन्यांकडे एकाधिक दावे दाखल करू शकतात, लवचिकता आणि निवड वाढवू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR