नागपूर : रेल्वे गाड्यांमधून घातक साहित्य आणि ज्वलनशिल पदार्थ तसेच चिजवस्तू नेण्यास सक्त मनाई असताना देखिल रेल्वेच्या पार्सल बोगीमधून चक्क गॅस सिलिंडर नेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. हा गैरप्रकार उघड होताच रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) शनिवारी रात्री एका तरुणाला अटक केली.
येथील रेल्वे स्थानकावरील पार्सल विभागातून काही जणांना हाताशी धरून दलाल कोट्यवधींची रोकड, मौल्यवान चिजवस्तू, प्रतिबंधित साहित्य, चिजवस्तू आणि ज्वलनशिल पदार्थ ठिकठिकाणी पाठवित होता. त्याची दखल घेत रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी पार्सल विभागात अत्याधुनिक स्कॅनिंग सेटअप लावला. स्कॅनर मशिनमधून स्कॅन केल्याशिवाय कोणतेही सिलबंद पार्सल रेल्वे गाडीत अपलोड करायचे नाही, असा आदेशही मित्तल यांनी संबंधित कर्मचा-यांना दिला आहे. त्यामुळे अनेक दलालांनी विरोध करून काही व्यापा-यांना स्कॅनर मशिनच्या विरोधात उकसावणे सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर, शनिवारी एका पार्सलची तपासणी सुरू असताना त्यात गॅस सिलिंडर आणि एक छोटी शिगडी लपवून असल्याचे दिसून आले. आरपीएफचे एएसआय बी. के. सरपाते आणि डी. एस. सिसोदिया यांनी लगेच त्याची दखल घेत चौकशी सुरू केली. हे पार्सल सचिन पिांपळे ब्रदर्स पॅंिकग मुव्हर्स कार्गोच्या बिलावर १० नग घरगुती सामानाची नोंद करून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. नागपूरहून हे प्रतिबंधित सामान पुण्याला जाणार असल्याचेही पुढे आले. त्यामुळे रोहित गणेश बहोरिया (वय ३४, रा. न्यू इंदोरा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आमिषापोटी खोटी माहिती देऊन हे ज्वलनशिल तसेच प्रतिबंधित साहित्य रेल्वेत लोड करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरपीएफने रेल्वे कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.