नवी दिल्ली : भारत-म्यानमार सीमेजवळ, म्यानमार लष्कर आणि लष्करी राजवटीला विरोध करणार्या सैन्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरु असून यामुळे सुमारे पाच हजार विस्थापित लोक म्यानमारमधून मिझोराममध्ये पोहोचले आहेत. बुधवारपर्यंत म्यानमार लष्कराच्या ४५ जवानांनीही मिझोराम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आणि नंतर म्यानमारला परत पाठवण्यात आले. म्यानमारचे अनेक नागरिक गृहयुद्धामुळे सीमावर्ती भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ईशान्य भारतीय राज्य मिझोराममध्ये म्यानमारमधून मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे आगमन आणि सीमेवरील गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्यानमारच्या बंडखोरांनी भारताच्या सीमेवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांवर ‘गंभीर चिंता’ व्यक्त केली आहे. बागची म्हणाले की, आमच्या सीमेजवळ अशा घटनांमुळे आम्ही चिंतित आहोत. म्यानमारमधील सध्याच्या परिस्थितीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. हिंसा थांबली पाहिजे आणि संवादातून समस्या सोडविली जावी, अशी आमची इच्छा आहे.
ते म्हणाले की, सध्याचा संघर्ष सुरू झाल्यापासून आम्ही म्यानमारमध्ये शांतता, स्थैर्य आणि लोकशाही परत येण्याबाबत वारंवार बोलत आहोत. कदाचित म्यानमारमध्ये २०२१ ची वेळ आली असेल जेंव्हा मोठ्या संख्येने म्यानमारचे नागरिक भारतात आश्रय घेत असतील. ते म्हणाले की, सीमावर्ती राज्यांचे प्रशासन मानवतावादी आधारावर परिस्थिती योग्यरित्या हाताळत आहे.