बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र सिद्धरामय्या मोबाईल फोनवर कथित बदलीबाबत बोलत असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे कर्नाटकातील वातावरण चांगलेच तापले आहे. या व्हीडीओत बदलीचा विषय नसला तरी खोटा अपप्रचार करण्यात येत असल्याचा सिद्धरामय्या यांनी आरोप केला. पैसे घेऊन एक जरी बदली केल्याचे दाखवून दिल्यास राजकारणातून निवृत्त होईन, असे त्यांनी आव्हान दिले आहे.
माजी आमदार असलेले त्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र यांनी फोनवर बोलताना सीएसआर नियडी शाळेच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली. त्याचा विपर्यास आणि चुकीचे चित्रण केले जात असल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, यतिंद्र यांच्या भाषणात कुठेही बदलीचा उल्लेख नाही. यतिंद्र हे वरुणा मतदारसंघातील निवारा समितीचे अध्यक्ष आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) च्या माध्यमातून शेतातील शाळांच्या इमारतींची दुरुस्ती केली जात आहे. मंत्री एच. सी. महादेवाप्पा यांनी ही यादी दिली आहे. त्यावर चर्चा केल्याचे यतिंद्र यांनी सांगितले.
याबाबत कर्नाटकचे उप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, डॉ. यतिंद्र यांच्या संभाषणात अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजप-धजदचे नेते निराशेने अनावश्यक गोंधळ निर्माण करत आहेत. तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले की, काँग्रेस सरकारचा वसुली कारभार चव्हाट्यावर आला आहे. तुमच्याकडे या आरोपाचे उत्तरच नाही. हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे की, कर्नाटकचा सुपर सीएम? मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.