श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चे पाच दहशतवादी ठार झाले होते. कुलगाम जिल्ह्यातील चकमक संपल्यानंतर काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक व्ही.के. बिर्डी म्हणाले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून परिसराची चौकशी करण्यात येत आहे. ड्रोन फुटेजद्वारे दहशतवाद्यांचे मृतदेह शोधण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुलगामच्या नेहामा गावाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. अधिका-यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी दहशतवादी हजर असलेल्या परिसराभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, परंतु रात्री ही कारवाई थांबवावी लागली. त्यांनी सांगितले की, कुलगामच्या नेहामा भागातील सामनोमध्ये रात्रभर शांतता राहिल्यानंतर शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला. सकाळी झालेल्या गोळीबारात दहशतवादी लपून बसलेल्या घराला आग लागली, त्यामुळे दहशतवाद्यांना बाहेर पडावे लागले.