नवी दिल्ली : जनरल इलेक्ट्रिकच्या सहकार्याने भारतात एलसीए मार्क २ लढाऊ विमान इंजिन तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेने यासंबंधी सर्व मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी सांगितले की, एलसीए मार्क २ इंजिन आणि स्वदेशी प्रगत मध्यम लढाऊ विमानांचे पहिले दोन स्क्वाड्रन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या सहकार्याने तयार करतील. अमेरिकेने यासंबंधी सर्व मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी जूनमध्ये दोन्ही देशांदरम्यान संरक्षण उत्पादन क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सहकार्याने लढाऊ विमानांच्या इंजिनांची निर्मिती करणार आहे. जनरल इलेक्ट्रिकने युएस काँग्रेसमध्ये संयुक्तपणे लढाऊ इंजिनांची निर्मिती करण्यास मान्यता मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. आता डीआरडीओ प्रमुखांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिकन सरकारने या अर्जाला मंजुरी दिली आहे.
जनरल इलेक्ट्रिक, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सहकार्याने एफ-४१४ जेट इंजिन तयार करेल. दोन्ही कंपन्या मिळून भारतात ९९ इंजिन तयार करतील आणि त्याची किंमत एक अब्ज डॉलर्सपेक्षा कमी असेल. जनरल इलेक्ट्रिक या इंजिनांच्या निर्मितीमध्ये जे तंत्रज्ञान प्रदान करेल त्यात गंज, धूप आणि थर्मल हस्तक्षेपापासून संरक्षण करण्यासाठी हॉट एंडसाठी विशेष कोटिंग तंत्रज्ञान समाविष्ट आहे. एचएएलला एलसीए एमके-२ तयार करण्यासाठी तीन वर्षे लागू शकतात.