पंढरपूर : सांगोला तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तालुक्यातील २७ गावे आणि २१७ वाड्या-वस्त्यांवरील ६८ हजार ८०० लोकांना ४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या नागरिकांची तहान शिरभावी पाणीपुरवठा योजना व टैंकरवर अवलंबून आहे, पण यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यात ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना केवळ कागदोपत्री राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र बहुतांशी ठिकाणी कार्यान्वित झाली नाही. तरीही पाणीपुरवठा विभाग उपकार्यकारी अभियंता यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार विविध गावांचे सरपंच करीत आहेत.
कोणत्याही प्रकारची माहिती न घेता ज्या गावांमध्ये ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना राबविण्यात आली आहे, त्या गावांचा टँकरद्वारे सुरू असणारा पाणीपुरवठा बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याची माहिती सरपंच देत आहेत. यामुळे संबंधित पाणीपुरवठा उपकार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभाराला आळा बसवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. तालुक्यात ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. परिणामी, विहीर व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याचा एक थेंब शिल्लक राहिला नाही. नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
परिणामी, तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाने टैंकर सुरू केले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे सध्या नागरिकांची तहान शिरभावी पाणीपुरवठा आणि टँकरवर अवलंबून आहे. तालुक्यातील २७ गावे आणि २१७ वाड्या-वस्त्यांवरील ६८ हजार ८०० लोकांना ४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या पाईपलाईनला जोडणी झाली नाही. ही परिस्थिती बहुतांशी गावांमध्ये असली तरी पाणीपुरवठा विभागाच्या ‘टैंकर बंद’च्या प्रस्तावावरुन सरपंच व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच ग्रामसेवक यांची धावपळ सुरू आहे. सध्या टँकरवर नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असून टैंकर बंद केले तर नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी विविध गावांच्या सरपंचांकडून करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार टँकर सुरू झाले खरे, परंतु ज्या गावांमध्ये ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना राबविण्यात आली आहे. त्या गावातील टँकरची सुविधा बंद करण्याच्या संदर्भात पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडून ग्रामपंचायत स्तरावर पत्रव्यवहार केला जात आहे, मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना प्रशासकीय यंत्रणेच्या कागदोपत्रीच पूर्ण दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र गावपातळीवर टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची चाचणीदेखील करण्यात आली नाही.