36.4 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeसंपादकीयआरोग्यम् धनसंपदा!

आरोग्यम् धनसंपदा!

आरोग्य चांगले असेल तर आपण सर्व कार्य सुव्यवस्थितपणे पार पाडू शकतो. सामाजिक मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी स्वस्थ आरोग्याची गरज असते. मानवाच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी जगभर दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्यदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या मागचा हेतू रोगावर नियंत्रण करून त्याचे निराकरण करणे व आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. देशाचे स्वास्थ्य हे प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर अवलंबून आहे. स्वस्थ आरोग्य माणसाला प्रसन्न व आनंदी राहण्यास मदत करते. बदलत्या जीवनशैलीमुळे आज आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत. आरोग्याच्या समस्या सर्वव्यापक आहेत.आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. कामाच्या व्यापामुळे आणि वेळ मिळत नसल्याने अनेक जण घरच्या अन्नापेक्षा जंकफुड आणि फास्टफुडला अधिक प्राधान्य देतात आणि आरोग्य बिघडवून घेतात. एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, जे लोक जंकफुड जास्त खातात, नियमितपणे प्रक्रिया केलेले अन्न खातात त्यांना अकाली मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. सध्या हृदयरोग, कर्करोग, मधुमेह अशा आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

बालकांमध्येही अशा आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील राष्ट्रीय पोषण संस्थेने (एनआयएन) गर्भवती महिला, स्तनदा माता, मुले आणि वयोवृद्ध यांच्या योग्य पोषणासाठी सर्वसमावेशक अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही संस्था इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत काम करते. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मीठ आणि भरपूर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा (पाकिटबंद चिप्स, कुकीज, ब्रेड, केचअप, कँडी आदी) वापर कमी करणे यासारख्या सामान्य सूचनांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, भारतातील एकूण आजारांपैकी ५६.४ टक्के आजार हे अनारोग्यदायी आहार घेतल्याने होतात. आरोग्यदायी आहार आणि नियमित शारीरिक कसरती, व्यायाम केल्यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाची समस्या ८० टक्क्यांनी कमी होते. बालकांमध्येही जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणा-या समस्या वाढत आहेत. ५ ते ९ वयोगटातील ५ टक्के मुले तर पौगंडावस्थेतील ६ टक्के मुले लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. सुमारे २ टक्के पौगंडावस्थेतील मुले बालकांमध्ये मधुमेहाची समस्या आढळून आली आहे.

१ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये जस्त, लोह, व्हिटॅमिन अशा पोषक घटकांच्या कमतरतेचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. देशात कुपोषणाच्या समस्येचे प्रमाण अजूनही जास्त आहे. लठ्ठपणाच्या समस्येचे प्रमाणही गत ३० वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आरोग्यदायी पदार्थांपेक्षा अनारोग्यदायी, अधिक प्रक्रिया केलेले उच्च चरबीयुक्त आणि मीठ-साखरेचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ परवडणारे झाले असून ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते त्यामुळे रक्ताल्पता तसेच लठ्ठपणाचे प्रमाण सर्व वयोगटांमध्ये वाढलेले दिसून येत आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भाज्या, पालेभाज्या, कंदमुळे, दुग्धजन्य पदार्थ आणि तेल यासह किमान ८ प्रकारच्या अन्नगटांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळाली पाहिजेत. यात भारतीय आहाराचा मुख्य भाग असणा-या तृणधान्यांचा वापर मर्यादित असावा, असे म्हटले आहे. तृणधान्यांऐवजी शरीराला अधिकाधिक प्रथिने प्राप्त व्हावीत यासाठी डाळी, मांस, चिकन, मासे यांचे प्रमाण ६-९ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत वाढवले पाहिजे. शाकाहारी लोकांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अंबाडीच्या बिया, सब्जाच्या बिया, अक्रोड, भाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाण्याची शिफारस करण्यात आली आहे. आहारातील मिठाचा वापर दिवसातून ५ गॅ्रमपर्यंतच मर्यादित असावा.

अधिक चरबी, मीठ अथवा साखरेचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ कटाक्षाने टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कालानुरुप अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. माणसाच्या राहण्याची, वागण्या, बोलण्याची अथवा चालण्याची रीत जरी सारखी असली तरी वेळोवेळी त्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कोणतीही आरोग्याची समस्या कशा स्वरूपात समोर उभी राहील याचा काही नेम नसतो. अशी समस्या निर्माण होऊ शकते याची मनुष्याला जाणीव झाली ती कोरोना काळात. तेव्हापासून आपल्या आरोग्याविषयी ब-यापैकी जागरूक झालेला माणूस आपण निरोगी राहावे, कोणत्याही व्याधी त्रास देऊ नयेत म्हणून प्रयत्न करीत असतो. डॉक्टर मंडळी वयोमानानुसार किमान ३० ते ४० मिनिटे चालण्याचा, व्यायाम करण्याचा सल्ला देतात. शारीरिक व्यायाम औषधांना, व्याधींना आपल्यापासून दूर ठेवू शकतात हे खरे असले तरी आपला दैनंदिन आहारदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक वेळा धकाधकीचे आणि ताणतणावाचे जीवन जगावे लागते, असे सांगत मिळेल ते खाद्यपदार्थ आपण पोटात ढकलत असतो.

काही वेळा झटपट आरोग्य सुधारण्यासाठी अनावश्यक आणि अति प्रोटिनयुक्त पदार्थ खातो आणि इथेच आरोग्य समस्या उभी राहते! साखर आणि मिठामुळे शरीरातील चरबीत वाढ होते त्यामुळे वेगवेगळ्या व्याधींना आमंत्रण मिळते. यासाठी मांसाहार, चटपटीत पदार्थ आणि अमृततूल्य (!) चहाचे प्रचंड सेवन टाळले पाहिजे. या उलट रोजचा आहार बदलता ठेवून प्रामुख्याने ताज्या भाज्या, पालेभाज्या, कडधान्य, दूध यांचा संयमित स्वरूपातला रोजचा आहार ख-या अर्थाने पोषक ठरणारा आहे. आपल्या जीभेचे चोचले पुरवत असताना जर आरोग्यविषयक भान पाळले गेले नाही तर त्याच्या दुष्परिणामांची तयारी ठेवावीच लागेल. त्यासाठी कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायलाच हवा. आजकाल जिममध्ये जाणे ही तरुणांची फॅशन बनली आहे. पिळदार शरीर हे पैसा खर्च न करता मैदानावरही होऊ शकते हे तरुणाईने लक्षात घेतले पाहिजे. शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR