33.4 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeधाराशिवनितळी येथे वृद्ध शेतक-यावर रानडुकराचा हल्ला

नितळी येथे वृद्ध शेतक-यावर रानडुकराचा हल्ला

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील नितळी येथील वृद्ध शेतकरी बळीराम पांडुरंग रोकडे यांच्यावर दि. १० मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नितळी शिवारातील त्यांच्या शेतात रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना घरच्या लोकांनी तातडीने कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना धाराशिव येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नितळी येथील वृद्ध शेतकरी बळीराम पांडुरंग रोकडे (वय १०५) हे दि. १० मे रोजी दुपारी नितळी शिवारातील त्यांचा मुलगा मारूती बळीराम रोकडे यांच्या शेतात होते. त्या दिवशी दुपारी त्यांच्यावर एका भल्यामोठ्या रानडुकराने हल्ला केला. त्यांच्या हाताचा चावा घेतला. यामध्ये त्यांच्या बोटाचा तुकडा निघाला असून गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने कोंड ता. धाराशिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना धाराशिव येथील जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वन विभागाच्या वतीने पिकांचे नुकसान वन्य प्राण्यांनी केल्यास तसेच जीवीतहानी झाल्यास शेतक-यांना आर्थिक मदत देण्याचा शासन निर्णय आहे. यासाठी वन विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. परंतु वन विभागाची वेबसाईट गेल्या काही दिवसापासून बंद असल्याने ऑनलाईन अर्ज करता आला नसल्याचे जखमी बळीराम रोकडे यांचा नातू आसाराम रोकडे यांनी सांगितले. सध्या त्यांनी वन विभागाच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR