27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरसोलापूरात चोर झाले पोलिसांवर मोर

सोलापूरात चोर झाले पोलिसांवर मोर

सोलापूर : उन्हाळ्यात पर्यटनाच्या निमित्ताने परगावी जातात तर काही ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांकडे राहायला जातात. नात्यातील कोणाच्या विवाहाला किंवा अन्य कार्यक्रमांसाठी बाहेरगावी जातात. अशा बंद घरांवर लक्ष ठेवून चोरटे त्याठिकाणी डाव साधत आहेत. १ मार्च ते १२ मे या सव्वादोन महिन्यात सोलापूर शहरात तब्बल ५००हून अधिक चोरीचे गुन्हे घडले आहेत.

विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील जुळे सोलापूर, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विडी घरकूल व अक्कलकोट रोड या भागात घरफोडी-चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. फौजदार चावडी, सदर बझार, जोडभावी पेठ या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. शहर पोलिसांनी अनेक गुन्ह्यांतील चोरट्यांचा शोध काही तासांत घेतला. मात्र, घरफोडी, चोरी, दुचाकी, मोबाईल चोरी कमी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, शहरातील गुन्हेगारांची तथा सराईत गुन्हेगारांची संपूर्ण यादी पोलिसांकडे आहे. दुसरीकडे सर्वाधिक चोरी, घरफोडी कोणत्या भागात होतात याचीही माहिती त्यांच्या दप्तरी असते. त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी नियमित दिवस-रात्री किमान काही तासाला तरी गस्त घालावी. जेणेकरून चोरट्यांना पोलिसांची भीती राहील आणि नागरिकांनाही सुरक्षित वाटेल, अशी सोलापूरकरांची अपेक्षा आहे.

रविवारी (ता. १२) भर दुपारी सव्वा एकच्या सुमारास रेल्वे पोर्टर चाळ (डीआरएम ऑफिसजवळ) येथील सुभाष भीमराव गुराखे यांच्या घरातून चोरट्याने एक लाख ५२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटाच्या लॉकरमधील हा मुद्देमाल चोरल्याची फिर्याद सदर बझार पोलिसांत दाखल आहे. पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे तपास करीत आहेत.

दुसरीकडे न्यू पाच्छा पेठेतील अमित अरविंद इंदापुरे (रा. आयस्केअर अपार्टमेंट) यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने इंदापुरे यांच्या घरातील तब्बल दोन लाख ६९ हजार १०० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मॉडर्न शाळेजवळील जयराम अपार्टमेंटमधील विनोद रतनसिंग शहा यांच्या घरातून चोरट्याने रविवारी अंदाजे पाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. पण, दागिन्यांच्या पावत्या नसल्याने पोलिसांत केवळ ५० हजार ८५० रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे मोदीखाना येथील अर्शिन अपार्टमेंटमधील अब्दुल रहिम काझी यांच्या घरातूनही चोरट्याने १३ हजार २५० रुपयांचे दागिने चोरले असून रविवारी झालेल्या या चोरीप्रकरणी सदर बझार पोलिसांतच गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील अपार्टमेंटमधील लोक ज्यावेळी परगावी किंवा कामानिमित्त काही तासांसाठी बाहेर जातात, त्यावेळी घराकडे लक्ष ठेवायला शेजारच्याला देखील सांगत नाहीत. दुसरीकडे घरात मौल्यवान वस्तू, मोठी रोकड ठेवू नका असे पोलिसांनी सांगूनही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे चोरी झाल्यानंतर घरातील सगळा मौल्यवान ऐवज लंपास होतो. याशिवाय चोरी करून चोरटे लाखोंचा मुद्देमाल घेऊन जातात, मात्र नागरिक काही हजाराचा चांगला सीसीटीव्ही घरासमोर लावत नाहीत. अनेक अपार्टमेंटमध्ये तर सुरक्षारक्षक देखील नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR