24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरआवक कमी झाल्याने लिंबाचे दर वधारले

आवक कमी झाल्याने लिंबाचे दर वधारले

सोलापूर : शहराचा पारा ४३ अंशांवर गेल्याने सकाळी दहा वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे सोलापूरकरांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर, दुसरीकडे यंदा उन्हाच्या तडाख्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत.

लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो १३० ते १५० रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी सोलापूरकरांना सात ते आठ रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. घाऊक बाजारात लिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत, तर किरकोळ बाजारात एक लिंबू सात रुपयांना विकला जात आहे.ग्रामीण भागात मंद्रुप, मोहोळ येथून लिंबाची आवक होत आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र, उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

हिवाळ्यात लिंबाचे दर नियंत्रणात होते. मात्र, तापमानात जसजशी वाढ होत आहे, तसतशी लिंबांच्या भावातही वाढ होत आहे. शहरातील कस्तुरबा मार्केट, लक्ष्मी मार्केट, विजापूर रोड, जुळे सोलापूर आदी बाजारात लिंबाचे भाव वधारल्याचे दिसून आले. प्रति किलो १३० रुपयांवर लिंबाचे भाव पोहोचले आहेत.उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबांचे दर असेच चढे राहतील, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR