नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ‘डीप फेक’बद्दल चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींनीही डीप फेकबद्दल चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात शनिवारी २०२२ बॅचच्या भारतीय पोलीस सेवा प्रोबेशनर्स अधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, पोलिस अधिकाऱ्यांनीही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच अपडेट राहणे गरजेचे आहे. पोलिस दलाला सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद आणि दहशतवाद यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. नवीन तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर गुन्हेगारांकडून केला जात असून डीप फेकसारखी आव्हानेही आहेत. अशा स्थितीत गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान अद्ययावत करावे लागणार आहे. कायदा-सुव्यवस्था आणि पोलिस प्रशासन ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, परंतु आयपीएस अधिकारी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात.
अशा प्रकारे देशाची पोलीस यंत्रणा एकदिलाने काम करते. ‘आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक, राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवर उद्योगपती तेव्हाच गुंतवणूक करतात जेंव्हा कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असते. अशा प्रकारे कोणत्याही क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस विभागाची भूमिका महत्त्वाची असते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.