19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरपाणीटंचाई टाळायची असेल तर काटकसरच हवी

पाणीटंचाई टाळायची असेल तर काटकसरच हवी

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह २१ पाणीपुरवठा योजना असणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत ९३ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे. त्यातील ४५.९६ दशलक्षघनमीटर जिवंत पाणीसाठा म्हणजेच २५.९७ टक्के पाणी आहे. यातील पिण्यासाठी २.५ दशलक्षघनमीटरचा उपसा होत असून बाष्पीभवनात ०.१० दशलक्षघनमीटर जात आहे. या सर्व वापराचा विचार केला तर प्रकल्पातील पाणी येणा-या पावसाळ्यापर्यंत पुरेल. परंतू, त्यासाठी काटकसरच करावी लागेल. अन्यथा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा आणि त्याचा वापर याचा मेळ घातला तर पाणीटंचाई टाळण्याकरीता पाण्याचा अपव्यय टाळण्याला प्राधान्य दिल्या शिवाय गत्यांतर नाही, अशी सध्याची परिस्थती आहे.

यंदा जिल्ह्यात दमदार आणि सलग पाऊसच झाला नाही. दोन पावसांमध्ये मोठा खंड राहिला. त्यामूळे यंदा पावसाची तूट सरासरीच्या निम्म्यापर्यंत खाली आल्याने जिल्ह्यात अनेक भागातील प्रकल्पांतील पाणी पातळी खालावली आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत खाली आल्याने दुष्काळाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत दुष्काळी परिस्थती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक वाड्या, वस्त्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबुन राहावे लागणार आहे.

मांजरा प्रकल्पावर लातूर शहरासह केज, धारुर, अंबाजोगाई, कळंब या शहरांचा पाणीपुरवठा आहे. या प्रकल्पावर जवळपास २१ विविध पाणीपुरवठा योजना आहेत. त्या योजनांसाठी दररोज २.५ दशलक्षघनमीटर पाण्याचा उपसा केला जातो. सध्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केल्यामुळे सिंचनाचा वापर थांबलेला असताना दररोज पाण्याची पातळी १ सेंटीमीटरने खाली उतरत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामानाच्या अंदाजानूसार परतीचा पाऊस पडण्याची शक्यताही धुसर झाली आहे. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. परतीचा पाऊस झाला नसल्यामुळे सद्यस्थितीत २५.९७ टक्के पाणीसाठा आह. त्यामळे सिंचनाला पाणी देता येणार नाही, अशी स्थिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR