जयपूर : राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद प्रचारात झोकून दिली आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी राजस्थानमधील वैर (भरतपूर) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी राजस्थानमध्ये काँग्रेसच पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. श्रीमंतांना श्रीमंत आणि गरीबांना गरीब बनवण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदी सर्वतोपरी प्रयत्न करा पण यावेळी (राजस्थानमध्ये) फक्त काँग्रेस येईल. त्यांना गरीबांना गरीब ठेवायचे आहे आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत बनवायचे आहे, म्हणून ते नेहमीच त्यांच्या मित्रांचा आणि मित्रांचाच फायदा करतात तर काँग्रेस गरीब, शेतकरी आणि तरुणांसाठी काम करते. जेंव्हा आपण गरिबांसाठी काही बोलतो तेंव्हा पंतप्रधान म्हणतात की, हे सर्व लोक पैसे वाटून घेत आहेत. पण गेहलोत हे संपूर्ण तिजोरी गरीबांवर उधळत आहेत.
दिशाभूल करण्यासाठी अग्निवीर योजना
खर्गे म्हणाले की, आम्ही गरीब जनतेला मदत करत आहोत. पंतप्रधानांनी श्रीमंतांचे १५ लाख कोटींचे कर्ज माफ केले. जेंव्हा आम्ही त्यांना म्हणालो की, गरिबांची कर्जे माफ करा तेंव्हा त्यांनी तसे केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. तरुणांची दिशाभूल करण्यासाठी केंद्राने अग्निवीर योजना आणली. आमचे सरकार स्थापन झाले तर मार्ग काढू, असे ते म्हणाले.