जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथे बस स्थानक बांधण्यात आलेले आहे असे असले तरीही दररोज सायंकाळच्या सुमारास उदगीर तसेच मुखेड या आगाराच्या बसेस जळकोट बसस्थानकात न जाता राष्ट्रीय महामार्गावरच थांबून याच ठिकाणी प्रवाशांना उतरवले जात आहे तसेच तेथूनच प्रवाशांना बसमध्ये चढावी लागत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरच एसटी बसची वाट पहात प्रवाशांना थांबावे लागत आहे . राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून एसटी बसची वाट पहावी लागत आहे .
जळकोट येथे सुसज्ज असे बस स्थानक आहे. या ठिकाणी एकावेळी दहा बस आल्या तरी थांबण्यास अडचण नाही एवढी मोठी जागा आहे. उदगीर तसेच मुखेड आगाराच्या बस दररोज सायंकाळी सहाच्यानंतर बसस्थानकामध्ये जातच नाहीत. परस्पर राष्ट्रीय महामार्गावरुनच पुढे मार्गक्रमण करीत असतात. काही प्रवासी हे जळकोट बसस्थानकात बस येईल या अपेक्षेने स्थानकात थांबून राहत आहेत परंतु अनेक वेळा बस ही स्थानकात येत नसल्यामुळे प्रवाशांना धावत राष्ट्रीय महामार्गावर जाऊन एसटीत बसावे लागत आहे. पाऊस असतानाही एसटी बस स्थानकात जात नाहीत यामुळे प्रवाशांना ऊन तसेच पावसात राष्ट्रीय महामार्गावर थांबावे लागत आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगात अनेक वाहने धावत आहेत तसेच प्रवासीही बसच्या प्रतीक्षेत राष्ट्रीय महामार्गावरच थांबत आहेत अशा वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
एसटी बसच्या चालकाला अगदी चार ते पाच मीटर अंतरावर असणा-या बसस्थानकामध्ये एसटी बस नेण्यास अडचण काय असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत. जळकोटमधील बसस्थानकामध्ये रात्री शेवटची गाडी असेपर्यंत सर्व बसेस बसस्थानकामध्ये जाऊनच परत याव्यात यासाठी लातूर येथील विभागीय नियंत्रकांनी विशेष लक्ष घालावे, तसे आदेश द्यावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.