कोलकाता : वृत्तसंस्था
लोकसभेसाठी देशात सात टप्प्यात मतदान होत आहे. त्यातील चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निवडणूक अखेरच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्यातच पश्चिम बंगालमधून अजून एक मोठी घडामोड समोर आली आहे. ममता बॅनर्जी पुन्हा खेला होबेच्या तयारीत आहे. त्यांनी सूर बदलला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीची कोनशिला ठेवली. पण इमारत फळाला येण्यापूर्वीच ते पुन्हा भाजपच्या ताफ्यात जाऊन बसले. जागा वाटपावरुन तृणमूल काँग्रेसने वेगळी चूल मांडली. देशात अनेक ठिकाणी बेबनाव दिसला. पण महाराष्ट्रासह काही भागात काँग्रेसला इतर पक्षांनी चांगली साथ दिली. भाजपची लाट थोपविण्यासाठी या प्रयोगाकडे सर्वांचेच लक्ष लागले. चार टप्प्यातील मतदानानंतर ममता बॅनर्जी यांनी रणनीती बदलली. त्यांनी इंडिया आघाडीला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. त्यातील १८ जागांवर मतदान प्रक्रिया झाली आहे. तर २४ जागांवर मतदान होणार आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली. इंडिया आघाडीला बाहेरुन पाठिंबा देऊन केंद्रात एक मजबूत सरकार आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. हे नवीन सरकार जनतेच्या प्राधान्याने अडचणी सोडवेल.
आताच सूर का बदलला
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी डावे आणि काँग्रेसवर राज्यात भाजप समर्थक असल्याचा आरोप लावला होता. पण आता त्यांनी थोडी नमती भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय विश्लेषक बुचकळ्यात पडले आहे. भाजपविरोधी मते राज्यात काँग्रेस आणि डाव्यांच्या पारड्यात पडू नयेत आणि ती तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात पडावीत यासाठी बॅनर्जी यांनी रणनीती बदलल्याचा दावा काही जण करत आहेत. देशात आणि राज्यात भाजपला थोपवायचे असेल तर काँग्रेस आणि डाव्यांपेक्षा तृणमूल हा सर्वात चांगला पर्याय असल्याची खेळी ममता दीदींनी खेळली आहे. म्हणजे एकाच दगडात तीन-चार पक्षी टिपण्याचा दीदीचा प्रयत्न आहे.
ममता बॅनर्जी यांनी जोरदार खेळी खेळली. त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांना थेट संदेश दिला आहे की, दिल्लीत इंडिया आघाडीशी कुठलेही शत्रुत्व नाही. कुठले पण वैर नाही. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्याच कलाने सर्व होईल, असा संदेश ममता दीदींनी दिल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.