35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeसोलापूरझेडपीच्या पाच शाळांमधील शिक्षक कारवाईच्या रडारवर

झेडपीच्या पाच शाळांमधील शिक्षक कारवाईच्या रडारवर

सोलापूर : नान्नज येथील जिल्हा परिषदेतील शाळेनंतर आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) अधिकाऱ्यांनी सांगोला, माळशिरस, पंढरपूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील सात शाळांना भेटी दिल्या.

त्यापैकी पाच शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीत शिक्षकांचा हलगर्जीपणा आढळला आहे. त्याचा अहवाल ‘डायट’कडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना सादर केला जाणार आहे. त्या शाळांमधील शिक्षकही कारवाईच्या रडारवर आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) झेडपी शाळांमधील इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीसाठी प्रश्नपत्रिका दिल्या जातात. त्यात प्राधान्याने गणित, मराठी व इंग्रजी विषयांची चाचणी घेतली जाते. जुलै-ऑगस्टमध्ये पहिली पायाभूत चाचणी होते. त्यात विद्यार्थ्यांना मागील इयत्तेतील किती अभ्यासक्रम येतो, याची पडताळणी होते. त्यानंतर दिवाळीपूर्वी सहामाही तर एप्रिलमध्ये वार्षिक चाचणी होते. त्या चाचण्यांचे पेपर शिक्षकांनी अचूक तपासणे अपेक्षित असते. त्या गुणांवरूनच किती विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे समजते.

मात्र, चुकीची उत्तरे लिहूनही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, अशुद्ध लेखन असतानाही पैकीच्या पैकी गुण दिल्याच्या गंभीर बाबी उत्तरपत्रिका तपासणीत समोर आल्या आहेत. नान्नज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे शिक्षक आता सीईओंच्या रडारवर आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सीईओंचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर व उत्तर सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या सात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी पाच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीत चुका आढळल्या असून त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना सादर केला जाणार आहे.असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूरचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी सांगीतले.

विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे लिहिलेली असतानाही गुण
दिले.,काही विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे पेन्सिलने लिहिली आहेत,अनेक प्रश्नांची उत्तरे खाडाखोड लिहूनही पैकीच्या पैकी गुण दिले,अशुद्ध लेखन, उत्तरात काही चुका असतानाही त्या प्रश्नांना पैकीच्या पैकी गुण दिले अशा त्रुटी आढळल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR