नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
आज महाविकास आघाडीच्या रॅली दरम्यान शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.
निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर यांच्या भगूर शहरात महाविकास आघाडीकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. ही रॅली सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले.
भगूरमध्ये सेनेचे दोन्ही गट आमने-सामने
विजय करंजकर हे ठाकरे गटातून नुकतेच शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. विजय करंजकर यांचे भगूरमध्ये वर्चस्व आहे. भगूर गावातील रॅली दरम्यान दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध झाल्याचे दिसून आले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद झाला नाही.