मुंबई : संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, २०२४ पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. मी सांगतोय तसे घडेल, असे संजय राऊत म्हणाले. जे जे महाराष्ट्राच्या वाटेत आडवे आले आहेत ते याच मातीत गाढले गेले आहेत. तसेच दोन गुजराती देखील नक्कीच गाढले जातील, असे म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
क्रिकेट विश्वचषकावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि भाजपला लक्ष्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या देशात काहीही होऊ शकते. कालपर्यंत हा खेळ होता. संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी होता. आता भारतीय जनता पक्ष सहभागी झाला आहे. आता हा खेळ राहिलेला नाही. हा इव्हेंट झाला आहे. भाजपचे लोक सांगतील की, मोदी होते म्हणून अशी बॉलिंग पडली, अशी गुगली पडली. मोदींनीच मंत्र दिला, अमित शहा क्रिकेटरच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. हे लोक खेळालाही सोडायला तयार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, राज्यपाल ज्यांना आपण घटनात्मक संस्था म्हणतो ते स्वतंत्रपणे काम करावे, अशी आमची भूमिका ही देशाची भूमिका आहे. पण ते आता केंद्राच्या सत्ताधाऱ्यांच्या तालावरती नाचत आहे. त्यामुळे ती सध्या त्यांची ती खाजगी प्रॉपर्टी आहे. २०२४ नंतर त्यांना स्वतंत्रपणे काम करावे लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.