36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार; जरांगेंच्या भव्य सभेचे आयोजन

भुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार; जरांगेंच्या भव्य सभेचे आयोजन

जालना : मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता आणखीनच वाढतांना पाहायला मिळत आहे. जालन्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची लढाई सुरु केली, त्याच जालन्यात ओबीसी सभा घेत भुजबळ यांनी जरांगे यांना आव्हान दिले होते. दरम्यान, अंबडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे यांची देखील आता जालन्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबर रोजी जालना शहरात ही सभा होणार आहे. छगन भुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी जालन्यात जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. १ डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात ही सभा होणार आहे. जिल्ह्यातील याबाबतच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (१८ नोव्हेंबर) जालना शहरातील मातोश्री लॉन्समध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी १ डिसेंबर रोजी जालना शहरातील आझाद मैदानात जरांगे यांच्या भव्य सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे यांच्या अनेक जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. यापूर्वी आंतरवाली सराटीत राज्याची सभा झाली. पण जालना जिल्ह्यासाठीची जरांगे यांची अजूनही एकही सभा झाली नाही.

शनिवारी पार पडलेल्या बैठकीत मनोज जरांगे यांच्या नियोजित सभेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्यात १ डिसेंबर रोजी भव्य अशी सभा आयोजित करण्याचा निर्णय झाला. या सभेस मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेणार आहे. मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात आयोजित ही सभा मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR