24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरपशुवैद्य हा प्राण्यांच्या आत्म्याशी एकरूप होणारा सर्वश्रेष्ठ डॉक्टर : डॉ. दास

पशुवैद्य हा प्राण्यांच्या आत्म्याशी एकरूप होणारा सर्वश्रेष्ठ डॉक्टर : डॉ. दास

पंढरपूर: (प्रतिनिधी)

माणूस आपल्या वेदना बोलून सांगतो व त्यावर डॉक्टर उपचार करतात. परंतु, पशु-पक्षी आपल्या वेदना बोलून सांगू शकत नाहीत. त्यांच्या वेदना जाणून घेऊन त्या दूर करण्याचे कौशल्य पशुवैद्यकाकडे असते. म्हणूनच पशुवैद्य हा त्या प्राण्यांच्या आत्म्याशी एकरूप होणारा सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ. राजेंद्र दास यांनी काढले.
डॉ. विश्वास मोरे लिखीत ‘पशुवैद्यक विश्वातील विश्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. दास यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूरच्या मनोरमा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे होते.

डॉ. मोरे यांच्या पुस्तकात त्यांचे पशुवैद्य म्हणून नोकरीतील अनुभव, कौटुंबिक नातेसंबंध आणि मित्र, समाजाशी असलेले त्यांचे नातेसंबंध हे अतिशय हृद्य रितीने प्रकट झाले आहेत. हे पुस्तक वाचताना वाचक कृतज्ञतेचा प्रवास अनुभवतो. या पुस्तकाचे त्यांनी आत्मचरित्रात्मक पुनर्लेखन करावे असे मी सुचवेन,
असेही प्रा.डॉ. दास म्हणाले. यावेळी श्रीकांत मोरे म्हणाले,प्राण्यांविषयी सहसंवेदना आणि माणुसकीचे सार डॉ. मोरे यांच्या पुस्तकात व्यक्त झाले आहे. कुटुंब, समाजसेवा आणि प्राणीसेवा यांचे वर्णन करताना पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.

प्रकाशन समारंभापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘दुर्वांकुर उत्स्फूर्त काव्य संमेलन’ झाले. त्यात सांगलीचे धनाजी पाटील, पुण्याचे डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, प्रा. अडगळे, आकाश फाटे, उज्ज्वला शिंदे आदींनी कविता सादर केल्या.
याप्रसंगी लेखक डॉ. विश्वास मोरे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, पुस्तकाच्या संपादिका राधिका कुलकर्णी, प्रा. ज्ञानेश्वर जाधव, शोभा मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. समारंभाला ‘स्वेरी’चे सचिव तथा प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, मोहोळचे माजी सभापती बाबासाहेव क्षीरसागर, मोहोळ अर्बन बँकेच्या चेअरमन संगीता फाटे, नाना फाटे, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रथमेश बनसोडे यांनी केले. प्रा. वृणाल मोरे यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR