मुंबई : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याने भारतात मंगळवार दि. २१ मे रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या देशभरात भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहखात्याने याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले की, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दु:खद प्रसंगी दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारने उद्या २१ मे रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दुखवट्याच्या दिवशी ज्या सरकारी इमारतींवर नेहमी राष्ट्रध्वज फडकावला जातो तिथं राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. तसेच या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत, असेही गृहखात्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
रविवारी खराब हवामानामुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. रईसी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांचाही मृत्यू झाला आहे. वरझाघन शहराजवळील डिझमारच्या डोंगराळ जंगलात हा अपघात झाला होता.