लखनौ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात प्रथमच चुरस वाढली आहे. भाजपने मागच्या दोन निवडणुकांत राज्यात एकहाती विजय मिळविला आहे. परंतु यावेळी सपा आणि काँग्रेस एकत्रित आले आणि राज्यात मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विरोधी पक्षातील काँग्रेस आणि सपाने अतिशय विचारपूर्वक उमेदवार मैदानात उतरविले. विशेषत: सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग कसा यशस्वी करता येईल, याचा विचार केला. त्यामुळे प्रथमच तगड्या भाजपसमोर आव्हान उभे ठाकले आहे. आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीचे ५ टप्पे झाले आहेत. आता आणखी २ टप्पे बाकी आहेत. या दोन्ही टप्प्यांत उत्तर प्रदेशात चांगलीच चुरस वाढली आहे.
पाचव्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि लखनौचे उमेदवार संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांचेही भवितव्य पाचव्या टप्प्यातच मतदान यंत्रात बंद झाले. आता राज्यासाठी सहावा आणि सातवा टप्पा महत्त्वाचा आहे. या दोन्ही टप्प्यांतही अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. दरम्यान, या दोन्ही टप्प्यांत उत्तर प्रदेशात भाजपसमोर सपा आणि काँग्रेसने तगडे आव्हान उभे केले आहे. इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा एकत्र आल्याने अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड भागात सोशल इंजिनीअरिंग फॉर्म्युला वापरला गेला. याचा फायदा सपा आणि काँग्रेसला होताना दिसत आहे.
मागच्या वेळी अवध प्रांतातील ३६ जागांपैकी सर्वच जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळीही या भागातील सर्वच जागा आपण जिंकू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला होता. परंतु इंडिया आघाडीने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही वाट वाटते तितकी सोपी नाही. भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणा-या उत्तर प्रदेशातच त्यांच्यासमोर आव्हान आहे. विशेषत: अवधमध्ये सोशल इंजिनीअरिंगचा सकारात्मक परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
या भागात इंडिया आघाडीने विशेषत: सपा आणि काँग्रेसने १९ उमेदवार मागासवर्गीय, ११ उमेदवार ब्राह्मण आणि खुल्या प्रवर्गातील ८, कुर्मी समाजातील ५, निषाद समुदायाचे ४ उमेदवार, पारसी समाजाचे प्रत्येकी एक , यादव, पाल, मुस्लिम समाजाचे प्रत्येकी एक उमेदवार मैदानात आहेत. अवधमधील ब-याच मतदारसंघांतील मतदान चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात झाले आहे. या मतदारसंघांत सर्व घटकांना उमेदवारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस आणि सपाला याचा नक्कीच फायदा होईल, असे बोलले जात आहे. अवधमधील आता केवळ ३ मतदारसंघांतील मतदान सहाव्या टप्प्यात होत आहे. यामध्ये आंबेडकरनगर, सुलतानपूर आणि श्रावस्ती मतदारसंघांचा समावेश आहे. रितेश पांडे हे येथे विद्यमान खासदार आहेत. ते बसपात होते. आता ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात रितेश पांडेविरुद्ध सपाचे लालजी वर्मा यांच्यात लढत होत आहे. सुलतानपूरमध्ये भाजपच्या मनेका गांधी आणि सपाचे भीम निषाद यांच्यात लढत होत आहे, तर श्रावस्तीमध्येही सत्ताधारी आणि विरोधकांत चुरस आहे.
२०१९ मध्ये १४ पैकी ११ जागांवर विजय
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अवधमध्ये एकतर्फी विजय मिळविला होता. त्यामुळे अवधमधील १४ जागांपैकी ११ जागांवर विजय मिळविला होता. परंतु यावेळी सपा-काँग्रेसने या भागात भाजपसमोर आव्हान उभे केल्याने भाजप आता मागच्याप्रमाणे आत्मविश्वासाने दावा करताना दिसत नाही. त्यात इंडिया आघाडीचे सोशल इंजिनीअरिंग तगडे झाल्याने भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे.
८ जागांवर मुस्लिम मतदान निर्णायक
उत्तर प्रदेशातील अवधमधील १४ जागांपैकी ८ जागांवर मुस्लिम समुदायाचे मतदान निर्णायक आहे. त्यांची लोकसंख्या २० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. एकट्या लखनौमध्ये मुस्लिम संख्या २५ टक्के आहे. तसेच सुलतानपूरमध्येही १७ टक्के मुस्लिम समुदाय आहे. बहराईचमध्ये तर मुस्लिम लोकसंख्या ३३.५३ टक्के आहे. या मतदारसंघात आतापर्यंत पाचवेळा मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. श्रावस्ती लोकसभा मतदारसंघातही सर्वाधिक मुस्लिम समुदाय आहे.