24.6 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeमहाराष्ट्रधुळ्यात मतदारांचा कौल कुणाला?

धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला?

धुळे : प्रतिनिधी
धुळे लोकसभा मतदारसंघात काल, २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. मतदानासाठी कडक उन्हातही रांगा लागल्या होत्या. मतदारसंघात ५५.९६ टक्के मतदान झाले. यामध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघात ५७.३१ टक्के मतदान झाले आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे चार जूनला समजेल.
दरम्यान, उमेदवारीसाठी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षाची पहिली पसंती होती. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. बच्छाव यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे आमदार पाटील यांच्याकडे होती. त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्यात यश मिळवले. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने प्रचारात चांगली आघाडी देखील घेतली.

आमदार कुणाल पाटील धुळे ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात आघाडी घेतली. अगदी कुणाल पाटील यांच्या गावातही मतांच्या संख्येत भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होते? यावर धुळे लोकसभेच्या निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

धुळे ग्रामीण मतदारसंघात १०८ गावांमध्ये अतिशय शांततेत मतदान झाले. धुळ्यात प्रचंड उकाडा आहे. तापमान ४३ अंशावर गेले आहे. अशा स्थितीतही मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावलेल्या दिसल्या. ५७.३१ टक्के मतदान झाल्याने हे मतदान कोणाच्या बाजूला झुकते यावर निकाल लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदानाचा कल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता आहे.
निवडणूक लोकसभेची आहे मात्र त्यावर शेतकरी आणि अन्य प्रश्नांचा मोठा प्रभाव निर्माण झालेला दिसला. भाजप उमेदवार डॉ. भामरे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अवघ्या काही महिन्यांतच आमदार पाटील यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे एक प्रकारे ही त्यांची परीक्षाच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR