30.1 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeसोलापूरमहामार्गावरील नियमबाहय वाहतुकीला ब्रेक

महामार्गावरील नियमबाहय वाहतुकीला ब्रेक

सोलापूर : अत्याधुनिक अशी यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळालेली असून या वाहनांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महामार्गावर नियमबा पणे वाहने चालविणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनचालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईला आता वेग येणार आहे.

सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ५ आणि अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ३ अशी ८ अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने जिल्ह्याला मिळाली आहेत. या वाहनांद्वारे परिवहन कार्यालयाकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गांवर वाहन चालविणाऱ्यांनी नियमांचे पालन करून वाहने चालवा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

राज्यातील विविध महामार्ग व शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाकडून ‘इंटरसेप्टर व्हेइकल’ खरेदी करण्यात आल्या आहेत. यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेली ५ वाहने सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात व ३ वाहने अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली आहेत.

वाहनचालकांचा बेशिस्तपणा हे राज्यातील विविध अपघातांमागे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. महामार्गावर वेगमर्यादा ओलांडल्यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अनेक वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गावरील बेशिस्तीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १८७ इंटरसेप्टर व्हेइकल खरेदी केल्या असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयांना ही वाहने देण्यात आली आहेत.

‘इंटरसेप्टर व्हेइकल’ मधील सुविधा महामार्ग व अन्य महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीडगनने कारवाई करण्यात येते. ‘इंटरसेप्टर व्हेइकल’ मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. इंटरसेप्टर व्हेइकलच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईमुळे प्रशासनाकडे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी या वाहनात ब्रेथ अ‍ॅनलायजर यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मद्याच्या नशेत वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जागेवरच कारवाई करणे आता शक्य होणार आहे. त्याशिवाय हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्या पुराव्यासाठी दुचाकीस्वाराचा फोटो काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाहनांच्या टायरमधील हवेचा दाब मोजण्याची यंत्रणादेखील या वाहनांमधून देण्यात आली आहे. वाहनचालकांच्या जनजागृतीसाठी व सूचना देण्यासाठी लाऊडस्पिकरची सोयदेखील या वाहनांत देण्यात आली आहे. या वाहनांतून आता रात्रीच्यावेळीदेखील महामार्गावर वाहनांना थांबविता कारवाई करता येणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR