परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. २१ मे रोजी जाहीर झाला असून परभणी जिल्ह्याचा ९०.४२ टक्के निकाल लागला आहे. छ. संभाजीनगर विभागात परभणी जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानी आहे. जिल्ह्याच्या निकालात पुन्हा एकदा सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली असून ९४.३७ टक्के मुलींचा तर ८७.३९ टक्के मुलांच्या निकालाची टक्केवारी आहे.
परभणी जिल्ह्यातून १२वी परीक्षेसाठी १४ हजार ७७२ मुले तर ११ हजार २८३ मुली असे एकुण २६ हजार ५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ५०३ मुले तर ११ हजार १३६ मुली अशी एकुण २५ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आज जाहीर झालेल्या १२वी परीक्षा निकालात मुले १२ हजार ६७५ तर मुली १० हजार ५१० असे एकुण २३ हजार १८५ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये मुलांचा ८७.३९ तर मुलींचा ९४.३७ टक्के निकाल असून जिल्ह्याच्या एकुण निकालाची टक्केवारी ९०.४२ टक्के एवढी आहे.
परभणी जिल्ह्याच्या निकालात पाथरी तालुक्याने बाजी मारली असून ९३.९८ टक्के निकाल लागला आहे. तर जिल्ह्यात ८८.३२ टक्के निकालासह पूर्णा तालुका शेवटच्या क्रमांकावर आहे. परभणी जिल्ह्यातील गुणानुक्रमे तालुका निहाय निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे. पाथरी ९३.९८, पालम ९३.८४, जिंतूर ९१.६८, गंगाखेड ९१.४१, मानवत ९०.००, परभणी ८९.४२, सेलू ८८.४३, सोनपेठ ८८.२९ तर पूर्णा ८८.३२ टक्के एवढा निकाल लागला आहे.